मानोरा (वाशिम): ( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
श्रध्दा आणि परंपरेचा अनोखा संगम श्रीक्षेत्र आसोला येथे पाहायला मिळाला. महान तपस्वी परमहंस श्री सोहंमनाथ महाराजांच्या समाधीस्थळी बारस यात्रेनिमित्त आयोजित सोहळ्यात हजारो भाविकांनी 'शेंडीने गाडे ओढण्याची' अंगावर शहारे आणणारी पुरातन परंपरा जोपासत आपला नवस पूर्ण केला. ३० मार्च रोजी झालेल्या या सोहळ्याने आसोला नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती.
ऐतिहासिक परंपरेचे दर्शन
श्रीक्षेत्र आसोला येथे अनेक वर्षांपासून शेंडीने गाडे ओढून नवस फेडण्याची प्रथा आहे. यावर्षीही बारस निमित्त पहाटे ६ वाजता या थरारक कार्यक्रमाला सुरुवात झाली. संस्थानचे पुजारी पुरुषोत्तम महाराज यांनी स्वतः शेंडीने गाडे ओढून परंपरेचे पूजन केले. त्यानंतर नवस असलेल्या हजारो भाविकांनी ही कठीण मानली जाणारी विधी पूर्ण करत सोहमनाथांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
केवळ गाडे ओढणेच नव्हे, तर सप्ताहभर चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण मंगलमय झाले होते:
श्रीमद् भागवत कथा: ह.भ.प. बालयोगी गोपाल महाराज यांच्या रसाळ प्रवचनाने कथेची सांगता झाली.
प्रबोधन: कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्माची शिदोरी मिळाली.
महाप्रसाद: सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू झालेल्या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.
लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेता, आमदार सईताई डहाके आणि आमदार बाबुसिंग महाराज यांनी संस्थानला भेट देऊन दर्शन घेतले व उत्सवात सहभाग नोंदवला.
गाव बनले 'पुरणपोळीचे' स्वयंपाकघर
आसोला येथे येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी प्रचंड होती की, गावात नवस फेडण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. अशा वेळी भाविकांनी परिसरातील शेतांचा आणि झाडांचा आश्रय घेतला. झाडांखालीच चुली मांडून हजारो कुटुंबांनी श्रद्धेने पुरणपोळीचा नैवेद्य तयार करून आपला नवस फेडला.
सेवाभावी उपक्रम आणि व्यवस्था
आरोग्य सेवा: ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातर्फे विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विद्युत व पाणी: महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले, तर दानशरांनी टँकर आणि बिसलेरीद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली.
स्वयंसेवक: स्थानिक भजनी मंडळी आणि तरुणांनी रांगा लावून दर्शन सुलभ करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.
वाहतुकीचा खोळंबा: गर्दीचा ओघ अफाट असल्याने मंदिर परिसरात पोलिसांची कमतरता जाणवली. वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी पुरेसे बळ नसल्याने काही काळ भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
सोहमनाथांच्या 'जयघोषाने' आणि भक्तांच्या 'अलोट गर्दीने' आसोला यात्रा पुन्हा एकदा विदर्भातील श्रद्धेचे मोठे केंद्र म्हणून अधोरेखित झाली आहे.
No comments:
Post a Comment