मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
मानोरा तालुक्यात पेट्रोल व डिझेलच्या संभाव्य तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपासून आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल उपलब्ध होणार नाही, या भीतीने अनेक वाहनधारकांनी टाक्या फुल करण्याकडे कल वाढवला आहे. परिणामी, पेट्रोल पंपांवर अचानक मागणी वाढून काही ठिकाणी इंधन साठा तात्पुरता संपत असल्याची माहिती समोर येत आहे.
रांगेत दोन ते तीन तास उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “कामधंदा सोडून रांगेत उभे राहतो, मात्र नंबर आल्यावर इंधन संपल्याचे सांगितले जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
दरम्यान, ज्या पेट्रोल पंपांवर साठा उपलब्ध आहे, तेथे रात्री उशिरापर्यंत नागरिकांची झुंबड उडत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, इंधनाचा खरोखर तुटवडा आहे की केवळ अफवेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment