माहूर (नांदेड) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड येथील श्री दत्तात्रय संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांचे शनिवार (दि. ४ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
भगवान दत्तात्रयांचे जन्मठिकाण असलेल्या श्री दत्त शिखरचे ते ३० वे महंत होते. सन १९७८ मध्ये रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी महंतपदाची धुरा स्वीकारली आणि तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी अत्यंत निष्ठेने संस्थानचा कारभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात संस्थानचा सर्वांगीण विकास झाला तसेच भाविकांच्या सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या शांत, संयमी व अध्यात्मिक जीवनशैलीमुळे ते भाविकांच्या मनात आदराचे स्थान मिळवून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक उपक्रमांना चालना मिळाली आणि दत्तभक्तीची परंपरा अधिक बळकट झाली.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. ५ एप्रिल) दुपारी तीन वाजता संस्थानच्या नियमाप्रमाणे श्री दत्त मंदिर परिसरात समाधी देण्यात येणार आहे.
महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने दत्तसंप्रदायातील एक तेजस्वी अध्याय संपला असून, त्यांच्या स्मृती भाविकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. त्यांच्या कार्याचा व सेवाभावाचा ठसा काळाच्या ओघातही कायम राहील.
No comments:
Post a Comment