वाशिम, दि. १ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने, समन्वयाने आणि ठोस कृतीतून प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा त्यात तितकाच सहभाग महत्त्वाचा आहे. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत संतुलित प्रगती साधत, स्थानिकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देत आपण पुढे गेलो, तर वाशिम जिल्हा केवळ प्रगतच नव्हे तर समृद्ध आणि आदर्श जिल्हा म्हणून राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करेल असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय समारंभात राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री ना.भरणे बोलत होते.
यावेळी विधानपरिषद सदस्य आ. किरणराव सरनाईक,जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान,अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,अपर पोलीस अधीक्षक लता फड,उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना.भरणे पुढे बोलतांना म्हणाले की, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये ३ लाख हेक्टरवर सोयाबीन तर ६५ हजार हेक्टरवर तुर पिक प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांकडे दीड लाख क्विंटल घरचे बियाणे उपलब्ध असून खतांचे ७८ हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. युरिया व डीएपीचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. ‘महाविस्तार एआय’ अॅपद्वारे शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती दिली जात आहे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेत ४ कोटी तर यांत्रिकीकरणासाठी १५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने राज्यात सातत्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. कॅथलॅब लवकरच सुरू होणार असून ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट उभारले जात आहे. ग्रामीण रुग्णालय मालेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी तसेच कवठळ व लोणी अरब या उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणन मिळाले आहे. येत्या वर्षात ५० टक्के आरोग्य संस्था प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अन्न व नागरी पुरवठा योजनांद्वारे ७७६ रास्तभाव दुकानांतून ५० हजार अंत्योदय लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखर, तर ८.३५ लाख प्राधान्य कुटुंबांना धान्य वितरण सुरू आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत १ लाख ३१ हजार लाभार्थ्यांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर मिळत आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजनेत १ लाख कुटुंबांना लाभ मिळाला असून एपीएल योजनेत ८,५०० लाभार्थ्यांना २०२५-२६ मध्ये सुमारे १.६६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या योजनांमध्ये जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. ‘पोषण ट्रॅकर’ अॅपद्वारे १० निर्देशांकांवर आधारित मूल्यमापनात जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. लेक लाडकी योजनेत ७ हजार महिलांना ३५७ लाख रुपये वितरित झाले असून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत ५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
शिक्षण क्षेत्रात १६ शाळांचा पी.एम.श्री. योजनेत समावेश झाला आहे. साखरा येथील स्व. अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे ५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून १ हजार विद्यार्थ्यांना सहाय्य देण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी ३ हजार बचत गटांच्या माध्यमातून ३३ हजार महिलांना आर्थिक प्रवाहात आणण्यात आले आहे.
ऊर्जा क्षेत्रात महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत ५ हजार तसेच ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेतून ५ हजार सौर पंप कार्यान्वित झाले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत १११ मेगावॅट क्षमतेचे २७ प्रकल्प सुरू झाले असून ३७ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. बळीराजा मोफत वीज योजनेतून ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मार्चअखेर सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ३० मंडळांमध्ये शिबिरे घेऊन १८ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री ना. भरणे यांनी
एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगितले तसेच हीट वेव्हच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खबरदारी बाळगून आरोग्याची काळजी घ्यावी.असे आवाहन केले.
प्रारंभी पालकमंत्री ना. भरणे यांनी पोलिस पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली.यानंतर स्वातंत्र्यसैनिक आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी,खेळाडू, संस्था आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ आणि शेती अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाबीजकडून चार महत्त्वपूर्ण उत्पादने आजपासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.पालकमंत्री ना .भरणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यामध्ये आर व्ही एस एम हे सोयाबीनचे क्रांतिकारक वाण, पिकांवरील किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी निमास्त्र हे अतिसूक्ष्म निंबोळी पावडर, महा स्पीड हे जलद विघटक तसेच महाबीज कर्बमापकाचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व नायब तहसीलदार अर्चना घोळवे यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधी,अधिकारी कर्मचारी वर्ग, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय,पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment