दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
हरसूल येथे आयोजित समाजप्रबोधनपर कीर्तनाच्या कार्यक्रमात गावाच्या तीन सुपुत्रांचा ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली आणि उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना दाटून आली.
या सत्कारामध्ये रामदास आठवले सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र मानकर, प्रतिष्ठित वृत्तवाहिनी एबीपी माझाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले अनुभवी पत्रकार उमेश अलोने तसेच गेली २५ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे शिक्षण सुलभ करणारे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शिक्षक आमीन चौहान यांचा समावेश होता.
कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते तहसीलदार मयुर राऊत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघ, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिन्ही मान्यवरांचा ग्रामगीता व शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. गावाच्या मातीतून घडलेले हे सुपुत्र विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून त्यांनी आपल्या कार्यातून गावाचे नाव उंचावले आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
महेंद्र मानकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजहित जपले असून स्थानिक विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. उमेश अलोने यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज बुलंद केला आहे. तर आमीन चौहान यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्यामुळे गावातील तरुण पिढीसमोर आदर्श उभा राहिला असून “आपल्या गावातूनही मोठी कामगिरी करता येते” हा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही या तिन्ही व्यक्तींच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमात भक्ती, विचार आणि समाजाभिमुखतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सन्मान सोहळ्याला दाद दिली. गजानन सोनुने, बळवंत ठाकरे, मंगेश लोहटे यांचेसह गावातील तरुणांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment