Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, June 3, 2026

‘दामिनी’ ॲप देणार वीज पडण्याची पूर्वसूचना. नागरिकांनी ॲपचा वापर करावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वाशिम / शेंदुरजना (अ) दि. ३ जून (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)                     
मान्सून कालावधीत, विशेषतः जून व जुलै महिन्यांदरम्यान वीज पडण्याच्या घटना वाढत असून, दरवर्षी यामुळे जीवित व वित्तीय हानी होत असल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘दामिनी’ (Damini Lightning Alert) हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याच्या संभाव्य घटनांची पूर्वसूचना सुमारे १५ मिनिटे आधी नागरिकांना प्राप्त होते. हे ॲप जीपीएस प्रणालीवर आधारित असून, वापरकर्त्याच्या सद्यस्थितीनुसार आसपासच्या परिसरातील विजेची हालचाल आणि संभाव्य धोका दर्शविते.

ॲप कसे डाऊनलोड कराल?

१. मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
२. सर्च बारमध्ये “Damini Lightning Alert” असे टाइप करा.
३. भारत सरकार अथवा संबंधित प्राधिकरणाने प्रकाशित केलेले अधिकृत ॲप निवडा.
४. इन्स्टॉल बटणावर क्लिक करा.
५. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडा.
६. मोबाईलचे लोकेशन (जीपीएस) सुरू करा.
७. आवश्यक परवानग्या (Permissions) मंजूर करा.
८. वेळेवर सूचना मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुरू ठेवा.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिक तसेच शासकीय यंत्रणांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे :

• दामिनी ॲप तात्काळ डाऊनलोड करून वापरात आणावे.
• शासकीय अधिकारी व कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आपदा मित्र/सखी, ग्रामपंचायत डेटा एन्ट्री ऑपरेटर, सरपंच आणि पोलिस पाटील यांनी गावस्तरावर जनजागृती करावी.
• वीज पडण्याची सूचना प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी जावे.
• वादळी वातावरणात झाडाखाली, उघड्या जागेत किंवा उंच वस्तूंच्या जवळ थांबणे टाळावे.
• शेतीकाम, बांधकाम किंवा इतर मैदानी काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी.

हे ॲप नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, त्याचा नियमित वापर केल्यास वीज पडण्यामुळे होणारी हानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.

गावातील सर्व स्थानिक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक पूर्वसूचना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर