Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, June 3, 2026

'खेती बचाओ अभियान'ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादकमी खर्चातील नैसर्गिक शेती, हवामान बदल आणि पीक व्यवस्थापनाबाबत २१० शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम, (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)  बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभाग व आत्मा (ATMA) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'खेती बचाओ अभियान' अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वाशिम व कारंजा तालुक्यातील तब्बल २१० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, संतुलित खत व्यवस्थापन, हिरवळीच्या खतांचा वापर तसेच कमी खर्चातील नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात आली. 'जीवामृत' आणि 'बीजामृत' यांसारख्या तंत्रांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करतानाच जमिनीची सुपीकता वाढविण्याचे मार्ग तज्ज्ञांनी उलगडून सांगितले.

यावर्षी संभाव्य 'एल-निनो' परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. जल व मृदा संवर्धन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि अचूक पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी 'फार्मर ग्रुप लिग' स्पर्धेचे महत्त्व, उद्दिष्टे, मूल्यमापन निकष आणि सहभाग प्रक्रिया याविषयी सादरीकरण करण्यात आले. शेतकरी गटांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, सामूहिक कृतीला चालना आणि उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमास आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी विज्ञान केंद्र, करडा येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अजय मोरे, स्मार्टचे नोडल अधिकारी निलेश देशमुख, तंत्र अधिकारी संतोष थोरात, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे व अश्विनी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी उपसंचालक हीना शेख यांनी केले. प्रशिक्षण सत्रात शेतकऱ्यांनी विविध विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी उपयुक्त तांत्रिक माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मा व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर