Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, July 26, 2026

३० जुलैला दिग्रस येथे १० वी व १२ वीच्या गुणवंतांचा भव्य कौतुक सोहळा.पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान. पालकांचाही होणार गौरव.

दिग्रस :- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रमांच्या जोरावर शैक्षणिक यशाचे शिखर सर करणाऱ्या दिग्रस शहर व तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य कौतुक सोहळा गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दारव्हा रोडवरील बसस्थानकासमोरील राजेश्वर मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि दिग्रस मतदारसंघाचे आमदार ना. संजय राठोड यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी सोहळा संपन्न होणार आहे. यापूर्वी २७ जून २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे तो स्थगित करण्यात आला होता. आता हा बहुप्रतीक्षित गौरव सोहळा ३० जुलै रोजी होत असून सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दाद मिळावी, त्यांच्या यशाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ना. संजय राठोड हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करणार आहेत. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा देण्याची ही प्रेरणादायी परंपरा दिग्रस तालुक्यात विशेष लोकप्रिय ठरली आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी केलेला त्याग, सातत्यपूर्ण प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संस्कार यांचाही समाजासमोर गौरव व्हावा, या भावनेतून पालकांना सन्मानित करण्यात येणार असल्याने या सोहळ्याला एक वेगळीच सामाजिक उंची प्राप्त झाली आहे. दिग्रस शहर व तालुक्यातील विविध शाळांकडून दहावी व बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांची यादी आयोजकांकडे प्राप्त झाली असून, सर्व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसह उपस्थित राहून या गौरव सोहळ्याचा मान स्वीकारावा, असे आवाहन शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना व शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोबत फोटो : पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे छायाचित्र.

No comments:

Post a Comment

फॉलोअर