Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, July 9, 2026

एका माळरानावर वसंत बाग फुलवणारे गुरुवर्य समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड -फुलसिंगजी जाधव, छत्रपती संभाजीनगर

=================
    ​
    ​काळाचे चक्र कोणालाही थांबवता येत नाही, पण काही माणसे आपल्या कर्माने काळाच्याही पलीकडे जिवंत राहतात. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या अंगणात उभ्या असलेल्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक भिंतीला आणि हजारो विद्यार्थ्यांच्या मनाला आज एका मोठ्या पोकळीची जाणीव होत आहे. समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड साहेब आता आपल्यात नाहीत, ही बातमी मनाला सुन्न करून गेली आहे.
    उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयात प्राचार्य पदाची नोकरी करणारा एका तांड्यातील राजाराम राठोड नावाचा ध्येयवेडा माणूस १९७१- ७२ च्या दुष्काळात संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघत असतांना अशा भीषण  दुष्काळात गोर गरीब, दलित- पददलित, उपेक्षित , विमुक्त - भटक्या,  कष्टकरी वर्गाच्या, आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या  सर्वच जाती धर्माच्या मुलांमुलीसाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहरात वसंतराव नाईक महाविद्यालय सुरु करण्याचा स्वप्न घेऊन   आले. त्यांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी समाजातील अनेक जण पुढे सरसावले. ज्याला जे जमेल ती मदत करण्यासाठी पुढे येत गेले. साधने कितीही तुटपुंजी आणि कमी असली तरीही संकल्प मोठा आणि शुद्ध असेल तर न पेलणारे ओझेही माणूस पेलु शकतो. याचे वसंतराव नाईक महाविद्यालय हे एक उत्तम उदाहरण आहे.
      मी सुद्धा दुष्काळाच्या जखमा घेऊन या महाविद्यालयात जून १९७४ मध्ये पीयुसी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता . माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना आसरा देणाऱ्या वसंतराव नाईक महाविद्यालयाने मलाही आसरा दिला. 
        त्या काळात खोकडपुरा परिसरातील बंजारा कॉलनीत  बंजारा वसतिगृहात हे महाविद्यालय चालायचे.  तीन चार खोल्यात वर्ग घेतले जायचे आणि तीन चार खोल्यात बाहेर गावाहुन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालायचे. त्याकाळी चाळीस रुपये शिष्यवृती मिळायची. वसतिगृहात राहण्याचे आणि जेवणाचे तीस रुपये कपात करुन दहा रुपये तेल साबणासाठी दिले जायचे. दहा रुपयात एक महिना काटकसरीने काढावे लागायचे. 
       शहराच्या बाहेर औद्योगिक वसाहतीत महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरु झालेले होते. सर्वच क्षेत्रातील माणसं या महाविद्यालयाच्या उभारणीस हातभार लावत होते. कांही खोल्या बांधुन तयार झाल्या होत्या. महाविद्यालयालगत  वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निवाऱ्यासाठी पंधरा विस तट्याच्या खोल्या बांधण्यात आलेल्या होत्या. आणि आम्ही एकदाचे नवीन परिसरात विसावलो. बाजुलाच टोलेजांग अंबैसेडर हॉटेल होते. या भव्य हॉटेलच्या साक्षीने आम्ही दोन भाकरी आणि दोन वगराळ वरणावर भविष्याचे चित्र रेखाटत होतो.
      "दुरिताचे तिमिर जावो" हे बोधवाक्य घेऊन सुरु झालेल्या या महाविद्यालयात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी हे सर्व जातीधर्मातील जे खरोखरीच परिस्थितीने गांजलेले होते. अधिकांश विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय म्हणजे मायेची सावली होती. आपल्या उबदार प्रेमाच्या सावलीत संस्कार करणारे हे महाविद्यालय आहे. अशी प्रत्येकाला जाणीव व्हायची. या सावलीत घडत असतांना परकेपणाची भावना मनात कधीही चुकुन आली नाही. जस जसे दिवस पुढे जात होते तसे येथील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचार्यांची तळमळ अशी दिसायची की ते आपल्याच मुलांमुलींची काळजी घेत घडवत आहेत. एवढे प्रेम , ओलावा आणि आपुलकी पावलापावलात आम्हाला अनुभवाला मिळायची.
      *​श्रमाचा महामेरू*       प्रयोगशीलतेचा ध्यास घेतलेले
​प्राचार्य राजाराम राठोड साहेब हे केवळ एक प्रशासक नव्हते, तर ते एक 'प्रयोगशील विचारवंत' होते. त्यांनी आपल्या आयुष्यात श्रमाला सर्वोच्च स्थान दिले. त्यांना केबिनमध्ये बसून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यात अधिक रस होता. कृतीने त्यांनी 'श्रमाची प्रतिष्ठा' आम्हा विद्यार्थ्यांना शिकवले. "काम छोटे नसते, काम करण्याची वृत्ती मोठी असते," हा धडा त्यांनी आपल्या जगण्यातून दिला. विशेष करुन श्रमाचे मूल्य जास्त जपले जायचे. महविद्यालयाच्या परिसरातील अनेक कामे उदाहरणार्थ महाविद्यालयातील खोल्यांमध्ये मुरुम भरणे असो किंवा वसंत वसतिगृहाचा पायाभरणी असो, झाडे लावणे असो.  हे सर्व सामुहिक श्रमदानातून झालेले आहे.  प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, सेवक, विद्यार्थी हे सर्व श्रमदानात सहभागी होत असत.  
*​वसंतराव नाईक महाविद्यालय: एक संस्कारांचे केंद्र*
  ​प्राचार्य राठोड साहेबांच्या  मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महाविद्यालय हे केवळ पदव्या घेण्यासाठी शिक्षण देणारे नव्हते, तर ते एक 'संस्कार केंद्र' होते. त्यांनी महाविद्यालयाला एक कौटुंबिक स्वरूप दिले होते. विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होईल, यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. त्यांच्यासाठी विद्यार्थी हा केवळ एक रोल नंबर नव्हता, तर उद्याचा उमलणारा समाज होता.
​विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे अनेक प्रयोग
​त्यांनी राबविले. शैक्षणिक आणि उपक्रमशील प्रयोग आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी नवनवीन व्यासपीठे उपलब्ध करून दिली. वक्तृत्व, खेळ, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन असे विविध प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करताना त्यांनी स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळेच अनेक विद्यार्थी आज समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगत आहेत.
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग*
     शहराबाहेर असलेल्या या महाविद्यालयात मराठवाडा, खानदेश येथील विद्यार्थी अधिक असायचे. मागासवर्गीय, ग्रामीण, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. ज्यांच्या घरात ना संस्काराचे ज्ञान होते, ना भाषेचे. अधिकांश विद्यार्थी रांगडी होती. ज्ञानापासून कोसो दूर होती. आणि म्हणून प्राचार्य राजाराम राठोड साहेबांनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषा प्रयोग शाळा सुरु केली. याव्दारे विद्यार्थ्यांची भाषा सुधारावी, वाङ्गमयाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा प्रमुख उद्देश्य होता. ग्रामोफोन, रेडिओ व इतर अनेक साधनांव्दारे विद्यार्थ्यांची बुद्धिशक्ति वाढवण्याबरोबरच ज्ञान वृद्धिसाठीचा हा प्रयोग आमच्यासाठी एक वरदानच होते. 
    एकीकडे एका माळरानावर  महाविद्यालयाच्या इमारतीचे काम चालू होते; तर दुसरीकडे ज्या कांही अर्धवट खोल्या तयार झाल्या होत्या त्या खोल्यांमध्ये वर्ग सुरु झाले होते. त्या खोल्यांना ना प्लास्टर होते, ना खाली फरशा किंवा टाईल्स होत्या, ना खिडक्या होत्या. चार भिंतीपैकी एका भिंतीवर काळा फळा होता. जो आमच्या भविष्याचा आरसा होता. दिवसा या खोल्यांमध्ये वर्ग चालायचे. रात्री अभ्यासीकेत अभ्यास केल्यानंतर उघड्या हॉलमध्ये आम्ही बाकड्यावर अंग चोरुन कसे बसे झोपायचो. विशेषतः पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात खुप हाल व्हायचे. वसतिगृह तट्याचे आणि पत्र्याचे होते. त्यामुळे पावसाळ्यात खोल्यांमध्ये पाणी भरले जायचे. म्हणून महाविद्यालयाच्या खोल्यांमध्ये रात्री झोपायला जावे लागत असे. एखाद्या दिवसी वसतिगृहातच थांबलो आणि पाऊस खुप आला तर विटांवर लोखंडी पेटी ठेऊन त्यावर बसून रात्र काढायचो. संघर्षाला अंत नव्हता तरीही त्याचे दुःख किंवा वेदना मनावर नसायच्या. कारण प्राचार्य राजाराम राठोड साहेबांनी आम्हा विद्यार्थ्यांना मायेची जी सावली दिली होती; त्या सावलीत या वेदना कधी जाणवल्या नाहीत. 
*स्वयं शिस्तीचे धडे*
    रविवारचा दिवस आजुबाजुच्या परिसरातून आम्ही शेण गोळा करुन आणत असू आणि खोली आणि समोरील भाग सारवत असू. मार्च - एप्रिल महिन्यात गर्मीमुळे शेजारच्या सिडको कार्यालयासमोरील खांबाच्या प्रकाशात रात्री अभ्यासासाठी आम्ही जात असू आणि आकरा वाजेपर्यंत अभ्यास करुन पुन्हा वसतिगृहात येऊन झोपायचो.
      सुटीच्या दिवसी  सकाळी सकाळी अचानक प्राचार्य राजाराम राठोड साहेब यायचे. खोल्यांमध्ये अस्तव्यस्त पडलेले कपडे, पुस्तके पाहुन आम्हाला कांहीही न बोलता स्वतःच कपड्याची घडी करायचे आणि त्या खोलीला टॉपटीप कसे ठेवावे हे कृतीने आम्हाला समजावून सांगायचे. साहेबांनी एका खोलीत प्रवेश केला की, पुढील सर्व खोल्या स्वच्छ  आणि टॉपटिप व्हायच्या. कृतीतून त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना स्वयं शिस्तीचे धडे दिले. कायद्याच्या आणि नियमाच्या भाषेत हे एक महाविद्यालय होते. पण खऱ्या अर्थाने गरीब, वंचित विद्यार्थ्यांसाठी हे एक गुरुकुल होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या प्रकारे विविध प्रयोग, उपक्रम राबविले जात होते, त्या प्रयोगामागील जी उदात्त भावना होती त्याचे वर्णन चार दोन वाक्यात करणे खूप कठिण आहे. सामाजिक जाणिव आणि जातीधर्माचा कोणताही विचार न करता हे महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडत होते. एका गोष्टीचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्या काळात महाविद्यालयात मुलींची संख्या जेमतेमच होती. जी कांही मुलींची संख्या होती, त्यापैकी ब्राह्मण समाजाच्या सर्वसामान्य कुटुंबातील मुली अधिक होत्या. आणि या सर्व मुलींना पूर्णतः मोफत शिक्षण होते. याशिवाय मराठा, मुस्लिम व अन्य ज्या जाती जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळत नव्हती अशा विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना महाविद्यालयाने सुरु केली होती.   
      वसतिगृहात आम्हाला मिळणाऱ्या जेवणाबद्दल प्राचार्य राजाराम राठोड साहेब आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत अनेकदा बैठक घेतली जायची. शिष्यवृतीत  तुटपूंजी वाढ झालेली होती. चाळीस रुपयावरुन साठ रुपये झाली होती. म्हणून जेवणात थोडे बदल करावेत म्हणून आमची मागणी असायची. थोडी फार सुधारणा व्हायची. पण जेवणाची मात्रा मात्र दोन भाकरी आणि दोन वगराळ वरण हेच असायचे. तरीही मनात फारशी खंत नसायची. प्राप्त परिस्थितीवर मात करुन आमची घडवणूक चालू होती. 
    महाविद्यालयासमोरील जालनाकडे जाणाऱ्या रस्त्याने मेथीच्या भाजीसारखे दिसणारे घास भरून बैलगाड्या नेहमी शहरात जात असत. एकदा आमच्या रेक्टरने जनावरांना जे घास खायला दिले जायचे ते मेथीची भाजी समजून गाडीभर घास घेतली. आणि आम्हाला खाऊ घातले. हे प्राचार्य राठोड साहेबांना जेंव्हा कळाले तेंव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतले ! प्रचंड अस्वस्थ झाले. आम्हाला विषबाधा तर होणार नाही या चिंतेत ते पडले.
*सुसज्ज समृद्ध ग्रंथालय*
      एकीकडे शिक्षण घेत असतांना दुसरीकडे श्रमाचे मूल्य ही जोपासायला मिळत होती. डोंगर दऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबविले जात होते. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षेत आपले विद्यार्थी उतीर्ण व्हावेत म्हणून स्पर्धात्मक परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले. साहेबांच्या कल्पकेतेने सुसज्ज, समृद्ध असे ग्रंथालय आणि अभ्यासिका होती.  या ग्रंथालयात अनेक कोश, संदर्भ ग्रंथ, अनेक दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, अनियतकालिक, संशोधन पत्रिका आमच्यासाठी  हॉस्टेलच्या मेजवानीपेक्षा ही खरी मेजवानी होती. वर्षभरासाठी पुस्तक पेढीतून पुस्तके मिळायची. अभ्यासिका सकाळी १०:३० ते रात्री ११ वाजेपर्यंत चालायची. या अभ्यासीकेत प्राध्यापकांसाठी स्वतंत्र कैबिन होते.  संस्थेकडे अतिशय अल्प साधने असतांना अशा स्वरुपाचे ग्रंथालय आणि येथे राबविले जाणारे विविध उपक्रम पाहून महाविद्यालयाला भेट देणारे पाहुणे थक्क व्हायचे. मराठी, हिंदी, इंग्रजी वाङमय मंडळ, सामाजिक शास्त्र मंडळ, नियोजन वाणिज्य मंडळ हे सारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकसित करणारे उपक्रम होते. 
*साहित्यिकांची मांदियाळी*
    साहित्य आणि समाज याचा निकटचा संबंध लक्षात घेऊन महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिकांना बोलावून त्यांच्या ज्ञानाचे अमृत आम्हाला पाजवण्यात आले. एक नवी ऊर्जा आम्हाला याव्दारे दिली गेली. या महाविद्यालयात साहित्य क्षेत्राशिवाय सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सिनेसृष्टी अशा विविध क्षेत्रातील नामवंत विचारवंतांची मांदियाळी सतत असायची. सर्वांची यादी येथे देणे अवघड आहे. पण प्रामुख्याने मंगेश पाडगांवकर, गो. नी. दांडेकर, वसंत बापट, ज्योत्सना देवधर, धर्मवीर भारती, प्राचार्य नरहर कुरुंदकर, प्राचार्य राम शेवाळकर, सिनेकलाकार चंद्रकांत, नारायण सुर्वे, बाबा आढाव, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, प्रा. वा.सी. काळे, यदुनाथ थत्ते, ह. मो. मराठे, शिवाजी सावंत, केशव मेश्राम, शंकरराव खरात अशा अनेक मान्यवरांनी ज्या महाविद्यालयाच्या खोल्यांना साध्य खिडक्या सुद्धा नव्हत्या , प्लास्टर नव्हते तरीही त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना वेळ देऊन आमच्या विचार आणि भावनांना उभारी दिली हे आमच्यासाठी कोणत्याही स्वर्ग सुखापेक्षा निश्चितच कमी नव्हते. ज्याच्याबद्दल आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. ते आम्हाला सहजतेने मिळाले. याचे सारे श्रेय  कल्पक दृष्टी असलेले प्राचार्य राजाराम राठोड साहेबांनाच जाते. त्यांच्या सोबत जी प्राध्यापक, कर्मचारी, सेवकांची टीम होती ती सामाजिक भावनेने, जाणीवेने ओतप्रोत भरलेली होती. सर्वांकडून विद्यार्थ्यांना भरभरून प्रेम या ठिकाणी मिळत होते.  
*सामाजिक चळवळीचे केंद्र*
   एका माळरानावर फुलणारे हे महाविद्यालय केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नव्हते तर ते एक सामाजिक चळवळीचे केंद्र होते. या ठिकाणाहुन  अनेक सामाजिक न्यायाचे लढे लढले गेले. त्यात प्रामुख्याने मराठवाडा नामांतर लढयाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.  सामाजिक न्यायासाठी प्राध्यापक, कर्मचारी, सेवक, विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा भरण्याचे काम प्राचार्य राठोड साहेबांनी मोठ्या खुबीने केले. त्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
*जीवनाची शिदोरी*
    हे महाविद्यालय केवळ पुस्तकी ज्ञान देणारेच नव्हते तर एक सन्मानित जीवन जगण्यासाठी जीवन प्रवासात जी शिदोरी म्हणून आवश्यक आहे. ती देणारे, खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण देणारे उपेक्षित आणि आर्थिक परिस्थितीच्या चाकात भरडल्या जाणाऱ्या सर्वच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एका माळरानावर उभारलेले खरे गुरुकुल होते. खऱ्या अर्थाने एक संस्कार केंद्र होते. या गुरुकुलात आम्हाला कोणत्याही धर्म ग्रंथाचे श्लोक शिकवले गेले नाही. पण जीवन मूल्य जपायला लावणारे ज्ञान आमच्यासाठी कोणत्याही धर्मग्रंथातील ज्ञानापेक्षा श्रेष्ठ होते. हे  येथे आवर्जून उल्लेख करावेसे वाटते. *या ठिकाणी राबविण्यात येणारे  विविध प्रयोग, उपक्रम पाहुन  भारावलेले न्यायमूर्ती  चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी काढलेले उदगार खुप बोलके आहेत. " समाजातील शेवटच्या माणसांवर प्रेम करणे म्हणजे देशभक्ती. तीच राष्ट्रीयत्वाची भावना. जुगार, ज्योतिषी आणि जोगिया यांच्यामागे लागलेल्या समाजाला पुरुषार्थाची जाणीव करुन देणारा प्रयोग फार मोलाचा आहे. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पंढरीला जाता येत नसेल तर वारकऱ्याला प्रणाम केला की तो भगवंताला पोहोंचतो. त्या भावनेने सर्वांना विनम्र प्रणाम ."* यातच सारा सार आला.
 *.... म्हणून अवघड रथ  ओढणे शक्य झाले*
    तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांची प्रेरणा आणि सहकार्य, माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक, संस्थापक अध्यक्ष माजी खासदार तथा माजी मंत्री उत्तमरावजी राठोड आणि बंजारा समाजातील अनेक समाज सुधारकांबरोबर बंजारेत्तर अनेक मान्यवरांनी केलेले सहकार्य आणि दिलेल्या साथीमुळे समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड साहेबांना सामाजिक न्यायाचा हा अवघड रथ  ओढणे शक्य झाले. 
       सामाजिक बांधीलकीचा हा यज्ञ अखंडपणे चालवणारे गुरुवर्य समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड साहेब आज आपल्यात नाहीत. हा सामाजिक न्यायाचा यज्ञ पुढेही अखंडपणे चालत राहावा ही त्यांच्या चाहत्यांकडून अपेक्षा आहे. या यज्ञाच्या यजमानाने आता कायमची एक्झिट घेतलेली आहे.
     *समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड साहेब, तुम्ही या वसंत बागेला ज्या मायेने वाढवले, ती बाग कधीही न उजडो यासाठी आम्हा सर्वांना सद्बुद्धि आणि सत्प्रेरणा देत रहा.* तुमच्या विचारांचा प्रकाश हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने तेवत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
   ​तुमच्या निधनाचे हे दुःख शब्दातीत आहे. वसंत बागेतील प्रत्येक पान, प्रत्येक फूल आणि महाविद्यालयाचा प्रत्येक कानाकोपरा तुम्हाला आज निशब्द होऊन निरोप देत आहे.
   ​तुमच्या पावन स्मृतींना कोटी कोटी प्रणाम! ईश्वर तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो.
दिनांक : १०/०७/२०२६
    *फुलसिंगजी जाधव*
सामाजिक कार्यकर्ता
छत्रपती संभाजीनगर
संपर्क : ८९९९०९८२६५
===============

No comments:

Post a Comment

फॉलोअर