बुटले महाविद्यालयात 'लोकसंख्या शिक्षण' विषयावर प्रा. पाठक यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान;
डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या संधीचा फायदा घेण्याचे युवकांना आवाहन
दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
"देश जर खऱ्या अर्थाने उभा करायचा असेल, तर आजच्या तरुण पिढीने आपले आदर्श राजकीय व्यक्ती किंवा पक्षांमध्ये शोधणे बंद केले पाहिजे. ज्या २८ वर्षांच्या तरुणांनी स्वतःच्या कर्तृत्वाने अवकाशात रॉकेट उडवून इतिहास रचला, त्यांना आपले 'आयडॉल' बनवा," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, इतिहासाचे गाढे अभ्यासक, सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. सुधीर पाठक यांनी केले. बुटले महाविद्यालयात आयोजित 'लोकसंख्या शिक्षण' या विषयावरील विशेष व्याख्यान आणि विवेचनादरम्यान ते बोलत होते. आपल्या अत्यंत ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत त्यांनी लोकसंख्येच्या सांख्यिकीचा थेट देशाच्या भविष्याशी आणि तरुणांच्या कर्तृत्वाशी कसा संबंध आहे, याचे प्रभावी विश्लेषण केले.
स्व. अनिल विठ्ठलराव पाठक स्मृती विज्ञान आणि राज्यशास्त्र क्लब द्वारा आयोजित व्याख्यानात लोकसंख्येचे वास्तव मांडताना प्रा. पाठक म्हणाले, "जगाच्या तुलनेत भारताकडे अवघी २.४ टक्के जमीन आहे, तर जगातील १७ टक्के लोकसंख्या भारतात राहते. रशिया भारतापेक्षा ५ पट आणि अमेरिका ३ पट मोठा असूनही त्यांची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे. ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली आणि १९८९ पासून 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा होऊ लागला."
लोकसंख्या शास्त्राचे जनक मालथस यांच्या सिद्धांताचा उल्लेख करत ते म्हणाले, "तंत्रज्ञानाने मालथसचा सिद्धांत खोटा ठरवला आहे. केवळ जन्मदर जास्त आहे म्हणून लोकसंख्या वाढते हा समज चुकीचा असून, जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरकामुळे लोकसंख्या वाढ होत असते."
भारताच्या सध्याच्या प्रजनन दरावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, "भारताचा प्रजनन दर सध्या १.९४ आहे, जो रीप्लेसमेंट रेट २.१ पेक्षा कमी आहे. याचा अर्थ आपण पुढच्या पिढीसाठी कमी लोकसंख्या हस्तांतरित करत आहोत. जागतिक प्रजनन दर २.१८ आहे तर पाकिस्तानचा ३.५, चीनचा १.०२ आहे. चीनमध्ये तरुण घटून प्रौढांची संख्या वाढल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भारताचा प्रजनन दर कमी होत असल्याने भविष्यात तरुण घटून प्रौढांचे प्रमाण वाढेल; याचे संकेत आताच केरळमध्ये दिसू लागले आहेत."
बिहार २.८ आणि उत्तर प्रदेश २.६ या राज्यांमध्ये प्रजनन दर जास्त असल्याने लोकसंख्येच्या आधारे लोकसभेतील प्रतिनिधींची संख्या ठरवण्यावरून उत्तर आणि दक्षिण भारतातील लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्याख्यानाच्या समारोपात प्रा. सुधीर पाठक यांनी तरुणांना भावनिक साद घातली. जर्मन तत्त्ववेत्ता हेगेलच्या राष्ट्रवादाचा उल्लेख करत ते म्हणाले, "राष्ट्र सर्वोपरी आहे, व्यक्ती राष्ट्रासाठी असते, राष्ट्र व्यक्तीसाठी नाही. हनुमानाला त्याच्या अफाट क्षमतेचे विस्मरण झाले होते, तेव्हा रामाने त्याला त्याची आठवण करून दिली होती. आजच्या तरुणांनाही त्यांच्यातील क्षमता ओळखण्याची गरज आहे."
'स्काय रूट' आणि 'ध्रुव स्पेस' सारख्या भारतीय स्टार्ट-अप्सचे संस्थापक पवनकुमार चंदना आणि नागा भरत डाका यांचे उदाहरण देत ते म्हणाले, "वय वर्ष २८ असणाऱ्या या पोरांनी 'विक्रम-१' रॉकेट अवकाशात उडवून भारताचा इतिहास बदलला. सिस्टीमला दोष देत बसण्यापेक्षा तरुणांनी आपली क्षमता वाढवली पाहिजे. आपले आदर्श राजकीय पक्षांत नव्हे, तर अशा तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या युवकांमध्ये शोधा." असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थित युवकांना दिला.
व्याख्यानाचे सादरीकरण अत्यंत अप्रतिम आणि माहितीपूर्ण झाले. लोकसंख्या या अत्यंत रुक्ष आणि संख्यात्मक विषयाला शेवटी राष्ट्रप्रेमाची आणि भावनेची जोड देऊन प्रा. पाठक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची मने जिंकली. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
चौकट :
'डेमोग्राफिक डिव्हिडंड'ची ही शेवटची संधी!
"भारतात २००५ पासून सुरू झालेली तरुणांच्या संख्येची लाभांश स्थिती २०५५ पर्यंतच असेल. अशी स्थिती भारताच्या भविष्यात पुन्हा कधीही येणार नाही. चीन, जपान आणि हाँगकाँगने या स्थितीचा पूर्ण फायदा घेऊन प्रगती केली. भारतासाठी विकसित राष्ट्र बनण्याची हीच योग्य वेळ आहे. जर आपण या मानवी संसाधनाचा योग्य वापर केला नाही, तर आपले विकसित भारताचे स्वप्न कायमचे भंग पावेल. भविष्यात आपला देश प्रौढांचा होईल, तेव्हा शेजारील पाकिस्तान हा तरुणांचा देश असेल, ही धोक्याची घंटा लक्षात घेतली पाहिजे," असा इशारा त्यांनी दिला.
No comments:
Post a Comment