वाशीम,दि.७ ऑगष्ट २०२६:(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा )
शेतकऱ्यांना दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अकोला परिमंडळात सुरू असलेल्या विद्युत प्रणाली सक्षमीकरण व बळकटीकरणाच्या विविध विकासकामांची पाहणी गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक' (AIIB) च्या प्रतिनिधी मंडळाने केली. बीजिंग (चीन) येथे मुख्यालय असलेल्या या बँकेकडून आर्थिक साहाय्य मिळणाऱ्या विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, प्रतिनिधी मंडळाने महावितरणच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.
ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने एआयआयबीच्या अर्थसाहाय्यातून अकोला परिमंडळात ४६ नवीन उपकेंद्रे उभारली जात आहेत. याशिवाय ४१ ठिकाणी ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे, २१ पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे आणि या उपकेंद्रांच्या ऊर्जीकरणासाठी आवश्यक ३३ केव्ही व ११ केव्ही वाहिन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामांचा दर्जा तपासण्यासाठी एआयआयबीच्या प्रतिनिधी मंडळाने हा पाहणी दौरा आयोजित केला होता.
या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रतिनिधी मंडळाने पातूर तालुक्यातील प्रगतीपथावर असलेल्या ३३ केव्ही बाबुळगाव उपकेंद्र आणि वाशीम जिल्ह्यातील कार्यान्वित झालेल्या ३३ केव्ही पांडव उमरा उपकेंद्राला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी सुरक्षा व पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या खबरदारीची पाहणी केली.
दरम्यान भट उमरा (जि. वाशीम) येथील शेतकरी संतोष उमाळे यांच्या शेतात बसवण्यात आलेल्या सौर कृषीपंपाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. सौर कृषीपंपामुळे पीकपद्धती आणि एकूण जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांवर चर्चा करत एआयआयबीच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
एआयआयबीच्या या प्रतिनिधी मंडळात एआयआयबीचे सहयोगी अधिकारी शुवम सरकार रॉय, वरिष्ठ पर्यावरणतज्ञ इंद्राणी घोष, जलतज्ञ स्मिता मिश्रा, सामाजिक तज्ञ सू ट्रान क्वाय, पर्यावरण सल्लागार दमनजितसिंह मिन्हास आणि सल्लागार राजीव मिश्रा यांचा समावेश होता. पाहणी दौऱ्यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंते दीपक सोनोने, संदिप दरवडे, राजेश घाटोळे, कार्यकारी अभियंता निलम गांगोडे, कु. धनश्री, सोमनाथ मठपती, अजितपाल सिंह दिनोरे, विनोद माळवी, प्रविण चांभारे आणि विनोदकुमार भोयर यांच्यासह महावितरणचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ :- पांडव उमरा (वाशीम) येथील उपकेंद्राची पाहणी करतांना एआयआयबी प्रतिनिधी मंडळ, सोबत मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे व इतर अधिकारी
No comments:
Post a Comment