Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, August 8, 2026

राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत दिग्रस तालुक्यातील ११०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखविला कलागुणांचा अविष्कार

दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस ) : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा २०२६ दिग्रस तालुक्यात विविध केंद्रांवर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील तब्बल ११०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे तसेच चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला अभिव्यक्तीची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक व कल्पक चित्रे साकारत आपल्या कलात्मक कौशल्याचे दर्शन घडविले. यावेळी शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूरचे सहयोगी प्राध्यापक डॉ सचिन हजारे यांनी ड्रीमलँड, राष्ट्रीय विद्यालय व अंजनाबाई जाधव शाळेला भेट देवून परीक्षेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागाबद्दल त्यांनी कौतुक केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष गवारे, चित्रकला स्पर्धेचे जिल्हा समन्वयक गणेश बहादुरे, गटसमन्वयक प्रवीण इंगळे, केंद्रप्रमुख मिलिंद भगत, तसेच आमीन चौहान, अश्विन मनवर, अमोल ढाले, अनिकेत राठोड यांच्यासह सर्व साधनव्यक्ती, शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे दिग्रस तालुक्यातील बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळते आणि कला शिक्षण अधिक समृद्ध होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

चौकट : 
यांनी घेतला सहभाग : 
दिग्रसमध्ये सर्वाधिक सहभाग ईश्वर देशमुख डे बोर्डिंग व ड्रीमलँड शाळेचा होता. शाळेच्या अनुक्रमे २१२ व २०० मुलांनी तर राष्ट्रीय विद्यालयाच्या १०७ मुलांनी स्पर्धेत भाग घेतला. विद्यानिकेतन आणि विद्याभारती मिळून १४३ तर अंजनाबाई जाधव शाळेच्या ६१, नगर परिषद उर्दू शाळेच्या ४६ विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग नोंदविला. ग्रामीण भागातील तिवरी व आरंभी केंद्रातील १५८ मुलांनी सहभाग नोंदविला यात आदर्श विद्यालय तिवरी येथील ८९ मुलांचा समावेश होता. तर डॉ ए डी अत्तेवार हायस्कूल तुपटाकळी येथील ६६, डी व्ही एस पी एम हायस्कूल कलगाव शाळेचे २२ मुले परीक्षेला बसले होते. जिल्हा परिषद शाळा चिंचोली येथील १० तर मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या १० व जिल्हा परिषद शाळा निंभा येथील ४ मुलांनी सहभाग घेतला. याशिवाय शहरी व ग्रामीण सर्वच शाळांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

फॉलोअर