यवतमाळ,दि. ११ ऑगस्ट २०२६:(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
महावितरणतर्फे जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) विशेष 'ग्राहक समाधान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्राप्त झालेल्या एकूण २६० तक्रारींपैकी २२० तक्रारींचा (८५%) जागेवरच निपटारा करून ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. उर्वरित ४० तक्रारी पुढील सात दिवसांत सोडवण्यात येतील, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी दिली.
वीज ग्राहकांना सोयीचे व्हावे आणि त्यांच्या समस्यांचे त्यांच्याच कार्यक्षेत्रात जलद निरसन व्हावे, या उद्देशाने महावितरणने पुढाकार घेत जिल्ह्यातील ४ विभागांमधील १९ उपविभागांमध्ये एकाच दिवशी या शिबिरांचे आयोजन केले होते. या मेळाव्यात नवीन वीज जोडणी, नावात बदल, सरासरी व वाढीव वीजबिल आणि स्मार्ट मीटरशी संबंधित अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी स्वत: सर्व ठिकाणी उपस्थित होते.
शिबिरात आलेल्या एकूण २६० तक्रारींपैकी १२२ तक्रारी या जुन्या मीटरशी संबंधित होत्या, ज्यामध्ये सरासरी वीजबिल, नावात बदल आणि फॉल्टी मीटर यांचा समावेश होता. तसेच १०५ ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत शंका उपस्थित करत वीजबिल जास्त आल्याची तक्रार केली होती. अधिकाऱ्यांनी या सर्व अर्जांची पाहणी करत २२० तक्रारींचे घटनास्थळीच निवारण केले. यामध्ये स्मार्ट मीटरशी संबंधित ९५, तर इतर १०३ तक्रारींचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या स्मार्ट मीटरबाबत असलेल्या शंकांचे निरसन करताना त्याच्या अचूकतेची माहिती दिली. अचूक मीटर वाचन, दिवसा वीज वापरावर मिळणारी प्रति युनिट ८५ पैसे सवलत, दर अर्ध्या तासाला मिळणारी वीज वापराची नोंद आणि करंट लिकेजची माहिती या सुविधांमुळे स्मार्ट मीटर हे ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर व पारदर्शक असल्याचे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.
No comments:
Post a Comment